पक्षी निरीक्षणाबद्दल मार्गदर्शन करताना सुप्रसिद्ध पक्षी अभ्यासक उमेश वाघेला म्हणाले, “वेगाने विकसित होत असलेल्या शहरात जैवविविधता जपण्यासाठी पंचवटी टेकडी सारख्या अनेक शहरी परिसंस्थांचे संवर्धन करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी निसर्गचक्र समजून घ्यावे लागते. निसर्ग अभ्यासाची पहिली पायरी पक्षी निरीक्षण मानली जाते. पंचवटी टेकडी हे पुणे शहरासाठी एक महत्त्वाचे हरित फुफ्फुस आहे, जे स्थानिक आणि स्थलांतरित अशा दोन्ही प्रकारच्या पक्ष्यांसाठी महत्त्वपूर्ण अधिवास प्रदान करते.” अलाईव्ह चॅरिटेबल ट्रस्ट द्वारे पंचवटी टेकडी, पाषाण येथे रविवार, ९ नोव्हेंबर २०२५ रोजी महाराष्ट्र पक्षी सप्ताह निमित्ताने आयोजित विशेष मार्गदर्शित पक्षी निरीक्षण दरम्यान ते बोलत होते.
राज्यभरात साजरा होणारा हा महाराष्ट्र पक्षी सप्ताह, भारताचे आद्य पक्षी तज्ज्ञ डॉ. सलीम अली आणि अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केला जातो. या कार्यक्रमाद्वारे सर्वांनी या दोन थोर निसर्गवाद्यांना पक्षी निरीक्षणाच्या माध्यमातून आदरांजली वाहिली. या विशेष मार्गदर्शित पक्षी निरीक्षण कार्यक्रमात अनेक पालकांनी आपल्या बालकांसह पहिल्यांदाच निसर्गाचे धडे गिरवले. पक्ष्यांच्या प्रजाती ओळखायला शिकण्याची आणि वनक्षेत्र, पाणथळ आणि गवताळ प्रदेश यांसारखे विविध अधिवास आपल्या पक्षी मित्रांना कसे आधार देतात, हे समजून घेतले.
उमेश वाघेला म्हणाले, “निरीक्षणा दरम्यान पिंगळा, टकाचोर, तुईया पोपट, पहाडी पोपट, खंड्या, नीलपंख, तुतवार, वारकरी, पाणकावळे, टिबुकली, प्लवा बदक अश्या पक्ष्यांच्या एकूण 35 जातींची नोंद करण्यात आली. स्थलांतरित पक्ष्यांमधे फक्त तुतवात(कॉमन सॅंडपाईपर) याची एक जोडीचीच नोंद झाली. यंदा पावसाळा नोव्हेंबरपर्यंत लांबल्याने स्थलांतरित पाणथळ पक्ष्यांचे आगमन देखील लांबले आहे.”
अलाईव्ह चॅरिटेबल ट्रस्ट ही एक ना-नफा तत्त्वावर चालणारी संस्था आहे, जी पुणे आणि महाराष्ट्रातील निसर्ग आणि वन्यजीवनाच्या संवर्धनासाठी समर्पित आहे. जनजागृती, शिक्षण आणि बचाव कार्यावर संस्थेचा प्रामुख्याने भर असतो. शहरी परिसंवादात मानवी आणि वन्यजीव सहजीवनातील अंतर कमी करण्यासाठी ट्रस्ट सक्रियपणे कार्य करते. अलाईव्हचे सचिव चैतन्य राजर्षी यांनी टेकडीवरील वनस्पतींची ओळख करुन दिली. राजेंद्र कांबळे यांनी संयोजन केले.



0 प्रतिसाद ते “बालक-पालकांनी गिरवले पक्षी निरीक्षणात धडे”