“सामान्य नागरिक सुद्धा संशोधक होऊन, विज्ञानात योगदान देऊ शकतात. ते सुद्धा औपचारिक शिक्षण न घेता!” असे मत प्रसिद्ध सरीसृप व उभयचर तज्ज्ञ डॉ. वरद गिरी अलाईव्ह चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित ‘मिळून सारे संशोधक: जैवविविधतेतील आपली भूमिका’ या विशेष सत्रात व्यक्त केले. निसर्ग विज्ञान अधिक सर्व समावेशक व्हावे, यात जनसामान्यांसह विद्यार्थ्यांचा देखील सक्रिय सहभाग असावा या उद्दिष्टाने अलाईव्ह चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे आयोजित पहिल्या ‘अलाईव्ह सीएनसी स्कुल ब्लिट्झ 2025 (Alive CNC School Blitz 2025) अंतर्गत शाळांसाठी घेतलेल्या स्पर्धेचा भाग म्हणून हे व्याख्यान आयोजित केले होते. डॉ. गिरी म्हणाले, “जैवविविधता संवर्धन हे अचूक, वैज्ञानिक डेटावर अवलंबून असते, परंपरागतपणे प्रशिक्षित शास्त्रज्ञांकडून गोळा केले जाते. परंतु जैवविविधता हा एक विशाल आणि गुंतागुंतीचा विषय असल्याने, आवश्यक डेटाचे प्रमाण प्रचंड आहे आणि तज्ञांची संख्या मर्यादित आहे. तर आपण ही तफावत कशी भरून काढू शकतो? याचे उत्तर नागरिक विज्ञानात आहे. एक जबाबदार नागरिक म्हणून, तुम्ही देखील मूलभूत जैवविविधता डेटा गोळा करून आणि एका मोठ्या वैज्ञानिक चळवळीचा भाग बनून अर्थपूर्ण योगदान देऊ शकता.”
डॉ. गिरी यांनी पश्चिम घाटात ५६ नव्या सरीसृप आणि उभयचर प्रजातींचा शोध लावलेला आहे. त्यांच्या नावे शास्त्रीय नामकरणात एका ‘जीनस’ला त्यांचे नाव देण्यात आले आहे. डॉ. गिरी यांनी बॉंबे नेचरल हिस्टरी सोसायटी (BNHS) ची धुरा समर्थपणे सांभाळली असून, सध्या रिलायंस फाऊंडेशन मधे प्रमुख शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी २०० पेक्षा अधिक नागरिक शास्त्रज्ञांना प्रशिक्षित केले आहे. सामान्य नागरिकांनी जंगलात, अंगणात किंवा प्रवासात केलेली निरीक्षणं, संशोधनासाठी किती आणि कशी उपयोगी पडतात, या बद्दल विविध खऱ्या घटनांच्या माध्यमातून, लोकविज्ञानाचे महत्त्व डॉ. गिरी प्रेरणादायी सत्रात सोदाहरण उलगडून सांगितले.
या कार्यक्रमा दरम्यान विजेत्या शाळा आणि विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण सोहळा सायंटिफिक कम्प्युटिंग, मॉडेलिंग अँड सिम्युलेशन विभागाचे सभागृह, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे नुकताच पार पडला. या स्पर्धेला पुणे, सोलापूर येथून अनेक शाळा आणि संस्थांनी सहभाग नोंदवला. या स्पर्धेचे समन्वयन अलाईव्हचे विश्वस्त डॉ. भालचंद्र पुजारी यांनी केले. डॉ. पुजारी म्हणाले,”पहिल्याच वर्षी घेण्यात आलेल्या चार दिवसांच्या अलाईव्ह सीएनसी स्कुल ब्लिट्झ 2025 एकूण 12 शाळा आणि संस्थांनी सहभाग घेतला. यात एकूण 24 निरिक्षकांनी परिसरातील जैवविविधतेतील 273 प्रजातींची एकूण 744 निरीक्षणे नोंदवली. ही सुरवात चांगली असून पुढील वर्षी सहभाग वाढेल”.
अपलोड मास्टर (सर्वाधिक निरिक्षणे) अवार्ड विजेत्या शाळा:
सुवर्ण ट्रॉफी पुणे मनपा शाळा क्र.174ब, कोंढवा; सिल्व्हर ट्रॉफी – पिसावरे माध्यमिक विद्यालय, पुणे; ब्राँझ ट्रॉफी – यशकीर्ती विद्यालय, पंढरपूर.
डायव्हर्सिटी चॅंपियन (सर्वाधिक प्रजाती) अवार्ड विजेत्या शाळा: सुवर्ण ट्रॉफी – पिसावरे माध्यमिक विद्यालय, पुणे; सिल्व्हर ट्रॉफी – यशकिर्ती विद्यालय, पंढरपूर; ब्राँझ ट्रॉफी – पुणे मनपा शाळा क्र.174ब, कोंढवा.
मोबिलीटी हिरो (सर्वाधिक सहभाग) अवार्ड विजेत्या शाळा: सुवर्ण ट्रॉफी – डी. एच. कवठेकर स्कुल, पंढरपूर; सिल्व्हर ट्रॉफी – पिसावरे माध्यमिक विद्यालय, पुणे; ब्रॉंझ ट्रॉफी – एस. एम. निर्मलादेवी विद्यामंदिर, पंढरपूर.
उल्लेखनीय सहभाग: दादामहाराज नाटेकर विद्यालयच्या प्रीती पैठणकर; जिल्हा परिषद शाळा, सांगवडेचे संदीप सकपाळ आणि निसर्ग संवर्धन पंढरपूरचे श्रीकांत बडवे यांना मेडल व प्रमाण पत्र देऊन गौरवान्वित करण्यात आले.
अलाईव्हचे संस्थापक अध्यक्ष उमेश वाघेला यांनी संस्थेच्या निसर्ग संवर्धन कार्याबद्दल माहिती दिली. स्वानंद केसरी ह्यांनी कार्यक्रमाची उपलब्धता अधोरेखित केली सचिव चैतन्य राजर्षी यांनी आभार मानले. या उपक्रमाला ‘ईको-गेको’चे धृव फडके यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
प्रतिक्रिया व्यक्त करा