अलाईव्ह चॅरिटेबल ट्रस्ट च्या एक दिवस निसर्गासाठी उपक्रमात विशेष मुला मुलींनी रक्षाबंधन दिनी वृक्षारोपण करुन वृक्षबंधनाचा संदेश दिला. अलाईव्ह चॅरिटेबल ट्रस्ट(पूर्वीचे स्वस्तिश्री) सन २०१० पासून दरवर्षी पावसाळ्यात या उपक्रमाद्वारे विविध ठिकाणी स्थानिक वृक्ष प्रजातींचे रोपण करुन उपक्रम राबवत असून उपक्रमाचे हे १६वे वर्ष आहे.
मुळशी रोड येथील उरावडे गावातील अनिकेत सेवाभावी संस्थेच्या ६१ विशेष मुलंमुली, कर्मचारी आणि बावधनच्या अरिहंत इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंटचे ६१ विद्यार्थी-विद्यार्थिनींनी या उपक्रमात सहभाग घेतला. या उपक्रमात परस पिंपळ, पळस, डाळिंब, बहावा, रामफळ, फणस, कांचनवेल, अर्जून, जांभूळ, सोनचाफा, सीता अशोक, काळा कुडा, कांचन, पेरु, काटेसावर, पांगिरा, आंबा, रतनगुंज अश्या विविध प्रजातींची एकूण ३० रोपं लावण्यात आली.
या उपक्रमात रक्षाबंधनसह वृक्ष बंधन साजरे करण्यात आले. उपक्रमात सहभागी अरिहंत इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांनी विशेष मुलींकडून आणि विद्यार्थीनींनी विशेष मुलांना राखी बांधून, त्यांना रक्षाबंधनाची भेता देऊन सण साजरा केला. ‘विशेष मुलांनी पहिल्यांदा रक्षाबंधन आणि वृक्षारोपण उपक्रमात सहभाग घेण्याचा दुहेरी आनंद साजरा केला. हा त्यांच्यासाठी एक वेगळा अनुभव होता. यापुढे या झाडांची निगा अनिकेत सेवाभावी संस्थेची ही विशेष मुलंमुली घेणार आहेत.’ अशी भावना अनिकेत सेवाभावी संस्थेच्या संस्थापक कल्पना वर्पे यांनी व्यक्त केली. सामान्य आणि विशेष मुलंमुली दोन्ही एकमेकांसोबत मिसळून गेल्याने सर्व मुलांचे आनंदी चेहरे पाहून संस्थापक कल्पना वर्पे भावूक झाल्या.
अलाईव्हच्या या उपक्रमाचे समन्वयक प्रा. समीर पाटील यांनी अनिकेत सेवाभावी संस्थेबद्दल माहिती दिली. ते गेले काही वर्ष या संस्थेत विविध आजाराने ग्रस्त अश्या विशेष मुलांना जगण्यासाठी उभारी देण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करुन त्यांचे निसर्गाशी आणि सामान्यजनांशी नाते जोडण्याची संकल्पना समोर ठेवून हा उपक्रम घेण्यात आला. अलाईव्हचे संस्थापक अध्यक्ष व पक्षी अभ्यासक उमेश वाघेला यांनी स्थानिक वृक्ष प्रजातींचे जैवविविधतेतील महत्व विषद करत उपस्थितांना वृक्ष परिचय करून दिला. उमेश वाघेला म्हणाले, वाढत्या शहरीकरणामुळे आणि रस्ता रुंदीकरण तसेच काही विकास कामामुळे वृक्षतोड मोठ्या प्रमाणात होत आहे. परिणाम स्वरूप हवेची गुणवत्ता धोकादायक पातळीवर पोचली आहे. तापमान दरवर्षी वाढत आहे. वृक्षसंपदा ही एक निसर्ग परिसंस्था आहे. जैवविविधतेचा मुख्य घटक आहे. आपला प्रत्येक श्वास हा अनेक वृक्षांनी तयार केलेला प्राणवायूमुळेच आहे. वृक्षांशिवाय आपलं जीवन अशक्य आहे.”
अलाईव्ह संस्थे द्वारा दरवर्षी पावसाळ्यात हा उपक्रम राबवण्यात येत असून उपक्रमाचे हे १६वे वर्ष आहे. या उपक्रमा अंतर्गत अनेक ठिकाणी लावण्यात आलेली रोपं आत्ता मोठ्या वृक्षात रुपांतरीत झाली असून त्यावर फूलं फळं येऊ लागली आहेत. संस्थेचे सचिव चैतन्य राजर्षी यांनी आभार मानले. समीर पाटील आणि राजेंद्र कांबळे यांनी संयोजन केले तर निसर्गप्रेमी योगेश चौधरी यांचे सहकार्य लाभले.

0 प्रतिसाद ते “एक दिवस निसर्गासाठी उपक्रमात विशेष मुलांचे वृक्ष बंधन”